पुणे – मतदान करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत तसेच मतदानाच्या अनुषंगाने असणाऱ्या मतदारांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
मतदार मदत केंद्राचे (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) उद्घाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अजित रेळेकर, सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. मतदार मदत केंद्रामध्ये 15 दूरध्वनी संच जोडले आहेत. विधानसभेसाठी दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही या कक्षाद्वारे मतदारांना करण्यात येणार आहे.
मदत केंद्रातून माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राम यांनी मतदारांचे संभाव्य प्रश्न विचारले, तसेच हे कर्मचारी समर्पक उत्तरे देत असल्याची खात्री केली. याबरोबरच दूरध्वनीवरून माहिती देतांना अभ्यासपूर्ण माहिती देण्याबाबत यावेळी त्यांनी सांगितले.
जिल्हा मतदार मदत केंद्र क्रमांक
020-26121231
020-26121259
020-26121263
020-26121264
020-26121267
020-26121268