पुणे – कसबा मतदार संघामध्ये शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनवडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपचे खासदार गिरीश बापट हे शिवसैनिकांवर दबाव टाकत आहेत, असा आरोप धनवडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यामुळेच “उद्धव ठाकरे यांना काही बोलू नका, आम्ही भगव्या झेंड्याखालीच राहणार’ असे सांगत धनवडे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याचे बुधवारी जाहीर केले. तसेच त्यांनी आपल्यासोबत 200 शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. आम्ही जरी पक्षाचा राजीनामा देत असलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक राहू, असेही धनवडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी काही मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. मात्र, भाजपने सर्वच जागेवर आपले उमेदवार उभे केल्याने शहरातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार वडगावशेरी, खडकवासला आणि कॅन्टोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांतील सेनेच्या बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र, कसबा विधानसभा मतदारसंघात अर्ज मागे न घेता धनवडे यांनी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली. त्यानंतर बुधवारी कसब्यातील 200 पदाधिकारी आणि शिवसैनिक पक्षाचा राजीनामा देत असल्याचे धनवडे यांनी जाहीर केले.
राजीनामे अधिकृतरीत्या पक्षाकडे दिले नाहीत
कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांच्यासोबत असलेल्या काही शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे अधिकृतरीत्या पक्षाकडे दिले नाहीत. त्यांनी आपले राजीनामे शहराच्या पक्ष कार्यालयात पाठविले नसल्याच माहिती शिवसेनेमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.