लंडन – इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान चक्क एक एअर ऍम्ब्युलन्स (हेलिकॉप्टर) मैदानात उतरल्याने खळबळ उडाली. यामुळे या सामन्यातील 20 मिनिटांचा खेळ वाया गेला.
डरहॅम आणि ग्लुस्टरशायर यांच्यातील सामना सुरू असताना ही घटना घडली. डरहॅमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता व सामन्यातील पहिलेच षटक सुरू असताना हे हेलिकॉप्टर मैदानात उतरले.
मैदानाजवळ एक गंभीर घटना झाल्याने ग्रेट वेस्टर्न एअर ऍम्ब्युलन्स मैदानात उतरली. मैदानावरच ही ऍम्ब्युलन्स उतरल्यामुळे तातडीने मदतही पुरवली गेली. एअर ऍम्ब्युलन्सने काही वेळानंतर टेकऑफ केल्यावर खेळ पूर्ववत सुरू झाला.
त्यावेळी समालोचकांनीही महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टरशॉटचा उल्लेख करत सामन्यात रंगत निर्माण केली. आता आम्हाला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पाहायला आवडेल, असे व्यक्त करत समालोचकांनी आपल्या विनोदबुद्धीचेही दर्शन घडवले.