पुणे – शहर परिसरात बुधवारी (दि. 14) सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप अनुभवायला मिळाली. रात्री उशीरपर्यंत पाऊस पिसाटल्याप्रमाणे कोसळत होता. पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
देशाच्या दक्षिण भागात सरकलेल्या मान्सूनच्या सक्रिय टर्फमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.
पुणे शहर परिसरातील बहुतांश भागांमध्ये बुधवारी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत मुसळधार हजेरी लावली. या संततधरांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. तर पावसामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्री साडेआठपर्यंत शहरात 19.8 मिमी पाऊस पडला.
शहरात बुधवारी 6 पर्यंत शिवाजीनगर येथे 4 मिमी तर लोहगाव येथे 8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुणे शहर परिसरात पुढील दोन दिवस वातावरणाची हीच स्थिती कायम राहणार असून पुढील 24 तासांत जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांने सतर्कता बाळगण्याचे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
परतीच्या पावसाचा प्रवास गुजरात आणि राजस्थान भागातून सुरू आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा प्रवास अंध्र प्रदेश-तेलंगणा- महाराष्ट्र असा प्रवास करत 15 ऑक्टोबरपर्यंत अरबी समुद्रात पोहोचेल. या स्थितीच्या प्रभावामुळेच या तिन्ही राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
– डॉ. अनुपम कश्यप, वरिष्ठ अधिकारी, हवामान विभाग