२६ जुलैला मुंबईत पुन्हा होणार अतिवृष्टी?

मुंबई – जुलैच्या सुरुवातीला पावसाने मुंबईची त्रेधा तिरपिट उडवून दिली होती. यामुळे मुंबईमध्ये सर्वत्र पाणी साचून रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. तसेच पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने संपूर्णपणे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. मात्र, काही काळासाठी पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर आता पाऊस पुन्हा परतणार असून येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. येत्या २६ जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टी होणार असून २७ आणि २८ जुलै रोजी पावसाचा जोर असण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली होती. अगदी कमी काळात झालेल्या या अतिवृष्टीमुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला. आता पुन्हा एकदा २६ जुलै सारखी स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण स्कायमेटने २६ जुलै रोजी पुन्हा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात, कोकणातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटने म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.