माणूस लठ्ठ होत चालला आहे, कारण नव्या जीवनशैलीत त्याला व्यायामासाठी वेळच नाही, अशी आपली आतापर्यंतची समजूत. म्हणजे अशी समजूत शास्त्रज्ञांनीच करून दिली आहे. पण आता या समजुतीच्या पार ठिक-या उडाल्या आहेत. माणूस जाड होतो तो त्याच्या बेसुमार खाण्यामुळेच, व्यायामाच्या अभावामुळे नाही. आफ्रिकेतील टांझानिया देशातील हाद्झा आदिवासी जमातीचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. या जमातीचे लोक अजूनही आदीमानवाप्रमाणे जंगलातील वनस्पती आणि शिकारीवर उदरनिर्वाह करतात.
त्यांचा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना आढळून आलं की, आपल्याला आवश्यक असणा-या कॅलरीज हे निश्चित असं मानवी वैशिष्टय़ आहे. म्हणजेच आपल्याला किती कॅलरीज आवश्यक आहेत हे ठरलेलं आहे. याचाच अर्थ असा की, आधुनिक काळात वाढत असलेला लठ्ठपणा हा आधुनिक निष्क्रिय जीवनशैलीचा भाग नसून अति खाण्याचा परिणाम आहे.
जगातील दर तीन माणसांपैकी एकाला लठ्ठ होण्याचा धोका आहे. या लठ्ठपणाला पाश्चिमात्य जीवनशैली कारणीभूत असल्याचं मानलं जातं. मात्र माणूस लठ्ठ होण्याला इतरही अनेक कारणं आहेत. यात प्रक्रिया केलेले, भरपूर साखर, चरबी असलेल्या अन्नाबरोबरच दैनंदिन कामं करण्यासाठी शारीरिक कष्ट करण्याऐवजी यंत्रांचा आधार घेणं, जास्तीत जास्त बैठी कामं करणं अशा घटकांचाही समावेश आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक क्रांतीनंतर आपल्या शरीरातलं आवश्यक कॅलरीजचं प्रमाण कमालीचं घटलं आहे आणि आहारातील बदलापेक्षा लठ्ठपणासाठी हा घटक सर्वात धोकादायक आहे.
टांझानियातील हाद्झा जमातीतील लोक त्यांची ऊर्जा कशी खर्च करतात याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. हाद्झा लोक आजही जंगलातील शिकारीवर जगतात, म्हणूनच प्राचीन मानवी जीवनशैलीचं उदाहरण म्हणून अभ्यासासाठी या लोकांची निवड करण्यात आली. एक हजारांच्या आसपास संख्या असलेले हाद्झा लोक प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि जंगली फळे, कंदमुळे आणण्यासाठी आजही बाण, लहान कुऱ्हाडी आणि खणण्यासाठी काठय़ांचा वापर करतात. ते आधुनिक शस्त्र किंवा बंदुकांचा वापर करत नाहीत.
अमेरिका, टांझानिया आणि युनायटेड किंगडममधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने १८ ते ७५ वर्ष वयोगटातील ३० स्त्री-पुरुषांच्या शरीरातील ऊर्जा खर्च होण्याच्या प्रमाणाचं मोजमाप केलं. तेव्हा त्यांना आढळून आलं की, हाद्झा स्त्री-पुरुषांमधील शारीरिक हालचालींचं प्रमाण खूपच जास्त होतं. पण जेव्हा त्यांच्या आकार आणि वजनाची तपासणी केली तेव्हा आढळून आलं की त्यांच्या चयापचयाचं प्रमाण हे पाश्चिमात्य लोकांपेक्षा वेगळं नव्हतं. अमेरिका किंवा युरोपमधील प्रौढ माणसांच्या तुलनेत हाद्झा शिकारी कितीतरी मोठय़ा प्रमाणात त्यांच्या कॅलरीज खर्च करत असणार असंच सगळ्यांना वाटलं होतं, असे अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. हर्मन पॉँट्झर यांनी सांगितलं. पण जी माहिती मिळाली त्याने सगळेच चकीत झाले. ऊर्जा खर्च होण्याची ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचं ते सांगतात.
निरोगी राहण्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक असल्याचं मत डॉ. पॉँट्झर यांनी व्यक्त केलं. त्यांचं म्हणणं आहे की, पाश्चिमात्य किंवा आधुनिक जीवनशैली व्यतीत करणा-या व्यक्तींचा आहार जास्त असल्याने त्यांचा लठ्ठपणा वाढतो आहे, ते व्यायाम करत नाहीत म्हणून नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही सक्रिय असणं, हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, पण त्यामुळे तुम्ही सडपातळ राहताच असं नाही. त्यासाठी तुम्हाला कमी खावं लागेल. उत्क्रांतीमुळे कदाचित आपला दैनंदिन ऊर्जाखर्च निश्चित झाला असण्याची शक्यता आहे आणि तो सर्व लोकांमध्ये सारखाच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.