ओतूर -येथील स्वप्नदृष्टांत मंदिरात तुकाराम बीज सोहळा उत्साहात संपन्न झाला. या दिवशी सकाळी साडेसात वाजता जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मूर्तीला हभप विठ्ठलमहाराज शितोळे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.
यानंतर अकरा वाजल्यापासून हभप पानसरे महाराजांच्या उपस्थितीमध्ये दुपारी मांदारणे येथील भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती व मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे अभंग व आरती यावेळी करण्यात आली.
यावेळी हभप विठ्ठलमहाराज शितोळे, बाळासाहेब डुंबरे, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष नितीन पन्हाळे, संजय दिवटे, बाळासाहेब जंगम, दत्तात्रेय शिंदे, डॉ. मनिष वोरा, हभप भोरमहाराज, शोभाताई तांबे, सविता जंगम, सुवर्णा जंगम, लोंढे, वारकरी व ग्रामस्थ घाटकर परिवारासमवेत सहभागी झाले होते.