अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर रात्री उशिरा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तब्बल सहा जण ठार झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे संगणयत येत आहे. दुचाकी आणि कार यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की या मध्ये इनोव्हा कारचा अक्षरशः चुराडा झाला होता.
शिरजगाव पोलीस स्टेशन येथील रात्रगस्त अंमलदार हे रात्री गस्तीवर असताना त्यांना रोडवरील पुलाजवळ मोटरसायकलची सीट पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले. अपघातातील जखमी व मृतक हे वाहनात फसलेले होते. त्यांना वाहनाबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आले.
दोघे जण बाईकवरुन गावी जायला निघाले होते. त्यावेळी भरधाव इनोव्हा कारने मागून या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण पुलावरुन थेट खाली फेकला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इनोव्हा कार चालकाचंही नियंत्रण सुटलं आणि इनोव्हाही अपघातग्रस्त झाली. या अपघातात इनोव्हा गाडी चक्काचूर झाली.
एकूण पाच जण इनोव्हा कारमधून प्रवास करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या अपघातानंतर लगेचच पोलिसांना कळवण्यात आले असून पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला आहे.