जेनेव्हा – भारतात सध्या हृदद्रावक परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचे कुटुंबीय रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या व्यवस्थेसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये लॉकडाऊन लावावे लागले, यावरून या गंभीर परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो अशा जागतिक आरोग्य संघटनेचे अर्थात डब्लूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
भारतात पोलिओ आणि ट्यूबरक्लोसिसच्या विरोधात काम करत असलेल्या 2600 तज्ज्ञांना करोनाविरोधात कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, प्रत्येक मार्गाने मदत करण्याचा डब्लूएचओ प्रयत्न करत आहे. भारताला ऑक्सिजन कन्संट्रेटर आणि रुग्णालयांसाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जगात आतापर्यंत जवळपास 14 कोटी 84 लाख करोना रुग्ण आढळले आहेत. यामधून 31 लाख 33 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहीम वेगाने राबवून करोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात सोमवारी फोनवर चर्चा झाली. जपानच्या पंतप्रधानांनीही मोदींशी चर्चा केली असून, दोन्ही देशांनी भारताला मदतीची ग्वाही दिली आहे.