वॉशिंग्टन : झोपेत असताना चालणे किंवा इतर काही कृती करणे हा केवळ चित्रपटांचा किंवा मालिकांचा विषय नसून प्रत्यक्षात सुद्धा तसे घडू शकते याचे एक उदाहरण नुकतेच अमेरिकेत समोर आले आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने झोपेत असतानाच तब्बल 160 किलोमीटर प्रवास पूर्ण करून एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचण्याचा विक्रम केला आहे. त्यामध्ये त्याने ट्रेनचा प्रवासही केला हा मोठा प्रवास पूर्ण करून दुसऱ्या शहरात पोहोचल्यानंतर सुद्धा या व्यक्तीची झोप पूर्ण झाली नव्हती तो झोपलेलाच होता.
तज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, झोपेत चालणे हा एक आजार असून त्यावर उपचार करण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे चार ते आठ या वयोगटातील मुलांमध्ये झोपेत चालण्याचा सवय असू शकते पण या सवयीवर वेळीच उपचार केले नाहीत. तर नंतरच्या काळामध्ये सुद्धा म्हणजेच तरुणपणात किंवा म्हातारपणीसुद्धा ही सवय अस्तित्वात राहू शकते. एखादी व्यक्ती झोपेत चालते हे कसे समजायचे याबाबतही तज्ञांनी काही निकष सांगितले आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती झोपेत असताना अचानक पलंगावरून उठून इकडे तिकडे फिरते आणि पुन्हा पलंगावर येऊन डोळे उघडे असलेल्या स्थितीत बसून राहते तेव्हा ती व्यक्ती झोपेत चालत असल्याचे सिद्ध होते.
त्याला कोणी काहीही प्रश्न विचारला तरी उत्तर न देणे किंवा कोणतीही प्रतिक्रिया न देणे अशा प्रकारची लक्षणे सुद्धा दिसू शकतात. अशा व्यक्तीची झोप जेव्हा पूर्ण होते आणि तो झोपेतून बाहेर येतो तेव्हा त्याला आपण झोपेत असताना काय केले हे काहीच आठवत नाही. मानसिक ताणतणाव झोप पूर्ण न होणे किंवा पोटाचे विकार यामुळे सुद्धा अनेकांना झोपेत चालण्याची सवय लागू शकते. वय वाढायला लागल्यावर झोपेत चालण्याची सवय कमी होते पण तरीसुद्धा ही सवय जर कायम राहिली असेल तर मात्र वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
ही सवय निघून जावी यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे तसेच कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण-तणाव न घेणे असे मानसिक उपचार तज्ञांनी सुचवले आहेत. झोपेत चालण्याचा आजार जर जास्त गंभीर असेल तर त्यावर उपचार करून काही औषधाच्या माध्यमातून सुद्धा बरे केले जाऊ शकते. आठवड्यातून दोन वेळा अशा प्रकारे झोपेतून चालण्याची कृती होत असेल किंवा एकाच रात्री दोन-तीन वेळा अशा प्रकारे झोपेत चालण्याची कृती होत असेल तर लगेचच वैद्यकीय व्यवसायिकांचा सल्ला घ्यावा असे सुचवण्यात आले आहे.
मुलांना झोपेत चालण्याची सवय असेल तर पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असते. मुले ज्याठिकाणी झोपली आहे तिथून ती सहजासहजी आणि सहजपणे बाहेर पडू शकणार नाहीत याची मुख्य काळजी घ्यावी लागते. ही सवय असणाऱ्या लहान मुलांच्या खोलीमध्ये दरवाजे आणि खिडक्या बंद राहतील याची काळजी घ्यावी लागते तसेच आसपास कोणतेही धारदार शस्त्रे म्हणजे कात्री किंवा सुरे असणार नाहीत याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक असते.