पिंपरी -प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तिच्या सुपारी देऊन तिचा खून घडवून आणला. खून करून पळून गेलेल्या आरोपींना पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. प्रियकराने प्रेयसीच्या खुनाची सात लाखांची सुपारी दिली असल्याचे तपासात समोर आले आहे.
बजरंग मुरलीधर तापडे (वय 45, रा. तळेगाव दाभाडे, पुणे. मूळ रा. बीड), पांडुरंग उर्फ सागर बन्सी हारके (वय 35, रा. मोशी, पुणे. मूळ रा. बीड), सचिन प्रभाकर थिगळे (वय 30, रा. बुलढाणा), सदानंद रामदास तुपकर (वय 26, रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. महिलेचा 9 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता तळेगाव येथे खून केला.
आरोपी बजरंग तापडे आणि महिला यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपासून महिलेने बजरंग याच्याकडे लग्नाबाबत तगादा लावला होता. बजरंग हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. बजरंगने तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने पांडुरंग हारके याला सात लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील चार लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले. पांडुरंग याने त्याचा ओळखीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी सचिन याला हे काम दिले. आळंदी येथे झालेल्या भेटीत पांडुरंग याने सचिन याला महिलेचा फोटो, नाव, पत्ता, जाण्या-येण्याचा मार्ग अशी सर्व माहिती दिली. त्यांनतर तळेगाव येथे सचिनला नेऊन महिलेला प्रत्यक्ष दाखवले आणि एक लाख रुपये आगाऊ रक्कम दिली.