ट्रेलरना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघातांची शक्यता
शिक्रापूर- शिक्रापूरसह परिसरात तळेगाव ढमढेरे, न्हावरे, जातेगाव, पाबळ या रस्त्यावर तसेच पुणे अहमदनगर महामार्गावर ट्रॅक्टर ट्रेलरच्या साह्याने धोकादायकरित्या ऊस वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सर्वत्र साखर कारखाने व गुऱ्हाळे सुरू असल्याने ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उसाची वाहतूक बैलगाड्या, ट्रॅक्टर ट्रेलर व ट्रकमधून होत आहे. मात्र ट्रेलरच्या साह्याने उसाची सर्वाधिक वाहतूक होताना दिसत आहे. पुणे अहमदनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे, त्यातच या उसाच्या ट्रेलरची भर पडली आहे. बऱ्याच वेळा ट्रॅक्टरला तीन ट्रेलर जोडलेले असतात तसेच प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरलेला असतो त्यामुळे झोल जाऊन ट्रेलर उलटण्याच्या घटना घडत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी उस व उसाच्या मोळ्या पडलेल्या असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. दिवस-रात्र उसाची अशी धोकादायक वाहतूक सुरू असून ट्रेलरला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बहुतांशी नवीन ट्रेलरला नंबर प्लेट नाहीत. तसेच हे ट्रॅक्टर चालकही मोठ्या आवाजात गाणी लावून बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवताना आढळतात. ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना नियमावली करून देऊन त्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.