पुणे –जमीन एनए (अकृषिक) असल्याची बनावट ऑर्डर, भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे 112 दस्तांची नोंदणी करण्याचा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 मध्ये उघडकीस आला. यानंतर एनए ऑर्डरची पडताळणी जिल्हा प्रशासनाने केली. यामध्ये 110 एनए ऑर्डर या बनावट असल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल महसूल अधिकाऱ्यांनी नोंदणी विभागाकडे सादर केला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 येथे मागील पाच महिन्यांतील 1,472 दस्तांची तपासणी केली असता 112 इतके दस्त बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे नोंदविण्यात आल्याचे आढळले. यावर नोंदणी व मुद्रांक विभागाने या 112 दस्तांमधील एनए ऑर्डरचे क्रमांक, त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्याची सत्यता पडताळणीची मागणी केली होती. पालिका, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन बांधकाम केले असेल, तसेच रेरा क्रमांक असेल तरच दस्तनोंदणी करता येते. मागील दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी बंद आहे. उपनगरांत शेकडो बेकायदा बांधकामे आहेत. तेथील दस्तांची नोंदणी बंद झाल्यामुळे हजारो सदनिका पडून आहे. हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन सदनिकांची दस्तानोंदणी करून घेण्यात आली.
आयएएस अधिकाऱ्याला दाखवले प्रांताधिकारी
ज्या अधिकाऱ्यांनी पुण्यात मोठ्या पदावर काम केले आहे, तसेच ते कधीच प्रांताधिकारी म्हणून पुण्यात काम केले नाही. थेट आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव प्रांताधिकारी म्हणून बोगस आदेशात वापरण्यात आले आहे. आयएएस सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून या ऑर्डर तयार करण्यात आल्याने महसूल विभागाने तात्परतेने या एनए ऑर्डरची पडताळणी केली.