हाथरस, बलरामपूर प्रकरणात भाजपचा हिंदुत्वाचा शंखनाद थंड पडला आहे का?

शिवसेनेची भाजपला विचारणा

मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी जबाब बदलावा म्हणून पोलिस दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे. हाथरसमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत. तिच्या कुटुंबियांना कोणासही भेटण्यास मनाई करण्यात येत आहे. यावरून आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे.  हाथरसपाठोपाठ बलरामपूरमध्येही तरुणीवर बलात्कार व नंतर खून झाला. पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळय़ांच्या कडा ओलावल्या.

‘महिलांवरील बलात्कार, अत्याचारांबाबत आवाज उठवाल तर याद राखा’ असेच जणू योगी सरकारने बजावले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. ते भगव्या कपडय़ांत वावरतात. पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत, पण मोदी यांना जगातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा आहे. योगी यांनाही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही. 

बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? मृतदेह कोणत्याही रूढी-परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती महिला देहाची, हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने, वेदनेने धरणीत गडप झाली असेल. 

महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱया योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? मुंबईत सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या की खून यावर भाजप प्रवक्त्यांनी वाहिन्यांवर चर्चा रंगवल्या, पण हाथरसच्या कन्येवर बलात्कार झालाच नाही यासाठी हे सर्व लोक वकिलीकौशल्य पणास लावत आहेत. हे संतापजनक आहे. 

आम्हाला आश्चर्य वाटते ते उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे. राहुल गांधींवर पोलिसांचा हल्ला होत असताना ‘योगी’राज्यातील तमाम विरोधी पक्ष संस्कृती व कायद्याचे हे वस्त्रहरण उघडय़ा डोळय़ांनी पाहत होते.

मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून ‘कर्कश’ मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे, समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱया ए अबले, आम्हाला माफ कर, असे शिवसेनेने म्हंटले आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.