लंडन – ब्रिटनच्या राजघराण्यातील वादावर केंद्रीत असलेल्या एका पुस्तकापासून राजपुत्र हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मर्केल अर्थात ड्युक ऍन्ड डचेस ऑफ ससेक्स यांनी स्वतःला दूरच ठेवले आहे. या अनधिकृत आत्मचरित्रामध्ये राजघराण्यातील अंतर्गत वितुष्ट आणि भेदाच्या राजकारणाच्या घडामोडींचा परामर्श घेण्यात आला आहे. या कौटुंबिक कलहामुळेच राजपुत्र हॅरी आणि मेघन मर्केल हे या वर्षाच्या प्रारंभीच्या काळात राजघराण्याच्या राजशिष्टाचारापासून स्वतःहून दूर झाले होते, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
“फाईंडिंग फ्रीडम’नावाचे पुस्तक “द टाईम्स’मधून क्रमशः प्रकाशित केले जात आहे. हॅरी आणि मेघन हे दोघेही हॅरीचे थोरले बंधू प्रिन्स विल्यम्स, त्यांच्या पत्नी केड मिडल्डन यांच्याशी मार्च महिन्यापासून फारच कमी बोलतात. तसेच मेघन मर्केल यांच्या कॅलिफोर्नियातील मित्रपरिवाराकडून बकिंगहॅम राजप्रासादातील अधिकाऱ्यांना चक्क “व्हायपर्स’ (विषारी सर्प) संबोधले जात असल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.
या पुस्तकासाठी हॅरी आणि मेघन यांची मुलाखत घेण्यात आलेली नव्हती. तसेच त्यांनी या पुस्तकासाठी काहीही योगदान दिलेले नाही, असे या राज दाम्पत्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलेले आहे. हे पुस्तक लेखकाच्या स्वतःच्या अनुभवावर आणि स्वतःच्या वैयक्तिक रिपोर्टिंगवर आधारलेले आहे, असे राजघराण्याच्या प्रकाशन विभागानेही म्हटले आहे.
पुस्तकाचे लेखक, ऑमिड स्कोबी आणि कॅरोलिन ड्युरंड यांनी ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स आणि राजघराण्यातील इतर सदस्यांमधील वाढत्या तणावाबद्दल या पुस्तकामध्ये लिहिले आहे. हे पुस्तक 1 एप्रिलपासून अधिकृत झाले. मेघन मर्केल यांनी केलेल्या तक्रारींकडे गांभीर्याने बघितले जात नव्हते. तसेच राजघराण्यातील अन्य सदस्य त्यांच्या खासगी जीवनातील घडामोडी प्रसिद्धी माध्यमांसमोर उघड करत असल्याचे मेघन मर्केल यांना वाटत होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.
राजघराण्यातील अगदी मूठभर व्यक्तींवरच विश्वास ठेवला जाऊ शकतो. बकिंगहॅम राजवाड्यातील जुने अधिकारी म्हणजे विषारी सर्प असल्याचे या दाम्पत्याच्या मित्रमंडळींना वाटत असे. राजघराण्यातील अंतर्गत घडामोडी सार्वजनिक केल्याने प्रिन्स विल्यम यांना दुःख झाल्याचे लेखकांचे म्हणणे आहे.
हॅरी आणि मेघन यांनी राजशिष्टाचाराचे सर्व अधिकार सोडून या वर्षीपासून अमेरिकेत वास्तव्य केले त्याला कारण राजघराण्यातील अंतर्गत वादच कारणीभूत असल्याचा ठाम दावाही “फाईडिंग फ्रीडम’ या पुस्तकात केला गेला आहे.