मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार फंड दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या दिल्ली भेटीला कोपरखळी लगावली. तसेच ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत जाऊन आल्याची आठवण करून दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी ते दिल्लीतील करोनाची पाहणी करण्यासाठी गेले असतील असे म्हटले. तसेच ते सध्या प्रत्येक गोष्ट दिल्लीत करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा आमदारकीचा फंडही दिल्लीतच दिल्याचे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञान उपलब्ध असून उपयोग न करणं दुर्भाग्यपूर्ण आहे. मी घराबाहेर पडत नाही, असा आरोप करणारे विमानातून न जाता बैलगाडीतून का जात नाही. सध्या करोनाच्या संसर्गाचाही धोका आहे. त्यामुळे मंत्रालयही बंद आहे. काम करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. मला घरात बसूनही राज्य हाकता येते. प्रत्यक्ष भेटीमध्ये फक्त एकाच ठिकाणी जाता येते, आता एकाचवेळी अनेक ठिकाणी जात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच आतासुद्धा हा एक विचित्र योगायोग आहे. पण ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी खांद्यावर आली. जागतिक आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशा वेळी ही जबाबदारी मिळाली. त्यातून आता आपण बाहेर जात असून हा कठीण काळ आहे. संकट कोणतेही असले तरी त्याच्या खोलात जाणं फार महत्त्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावी पॅटर्नची दखल घेत मुंबई हे असं शहर आहे ज्यानं कोणतीही आकडेवारीची लपवाछपवी केली नाही, अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टने दिली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेची दखलही नक्कीच गौरवाची गोष्ट आहे. म्हणूनची मी आकडेवारी लपवली किंवा अशा काही वक्तव्यांवर लक्ष देत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांच्या राममंदिराबाबतच्या वक्तव्यावर ते म्हणाले, देव हा आपल्या सर्वांमध्ये आहे. एकमेकांच्या रूपात तो आपल्याला मदत करत आहे. देवाचा आशीर्वाद म्हणजे रुग्णाला वेळेवर औषधोपचार मिळणे, रुग्णसेवा मिळणे हे आहे.
आपण ज्या सुविधा निर्माण करत आहोत त्या सुविधांच्या मदतीने रुग्ण बरे होणार नाहीत. तर त्यांच्या जोडीला डॉक्टर्सही हवेत. देव हा त्यांच्या रूपानेही आपल्याला मदत करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.