कराड – कराडमधील प्रभात चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चित्रपटगृहात लावलेले चित्रपटाचे पोस्टरही काढून टाकण्यात आले.
‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही चुकीच्या गोष्टींवर छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यभरात या चित्रपटाच्या प्रदर्शनास संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. त्यानुसार कराडमध्येही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी येथील प्रभात चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट बंद पाडला. तसेच या चित्रपटाचे पोस्टरही चित्रपटगृहातून काढून टाकण्यात आले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे कराड तालुकाध्यक्ष संभाजी शेडगे व शहराध्यक्ष भूषण पाटील म्हणाले, अखंड भारताचे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च दैवत आहेत. “हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे, तसेच सरदारांची प्रचंड बदनामी करण्यात आली असून इतिहासाची मोडतोड करून विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्या आहेत. असा चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास त्यास संभाजी ब्रिगेड शेवटपर्यंत विरोध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
यावेळी इतिहासाची मोडतोड करणाऱ्या निर्माते व दिग्दर्शक यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, “हर हर महादेव’ या चित्रपटाचे कराड शहरात दाखवण्यात येणारे शो मंगळवारपासून बंद करण्यात यावेत.
अन्यथा, संभाजी ब्रिगेडकडून सदर चित्रपटाचे सर्व शो बंद पाडण्यात येतील. असा इशारा देत संभाजी ब्रिगेडच्या कराड तालुकाध्यक्ष संभाजी शेडगे, कराड शहर अध्यक्ष भूषण पाटील, विष्णू सावंत यांनी प्रभात चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले. त्यानंतर चित्रपटगृह प्रशासनाकडून या चित्रपटाचे शो बंद ठेवण्यात आले आहेत.