आनंदाचा “लॉकडाऊन’ नाही…

गेल्या वर्षी म्हणजेच 2019 चा “प्रभात दीपावली विशेष’ आपल्या हातात देताना, कोणालाही कणभरही जाणीव नव्हती की, आगामी वर्षात जगभर उलथापालथ काय होणार आहे. चीनमध्ये खरे तर सप्टेंबर 2019 पासूनच नॉव्हेल करोना व्हायरसमुळे ‘कोविड-19’ ची लागण सुरू झाली होती आणि बघता बघता संपूर्ण जगाला या महामारीने कवेत घेतले. भारतातही मार्च 2020 पासून या महामारीने लाखो जणांचे जीव गेले, तर कोट्यवधी नागरिकांना याची लागण झाली; अनेक जण बरे होऊन घरीही परतले. आता एकामागून एक “लॉकडाऊन’नंतर “अनलॉक’ची आवर्तने सुरू झाली आणि हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. 

अशातच दीपावलीचा सण उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. “लॉकडाऊन’च्या प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात सर्वत्र मंदिरे आणि सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंदच असताना, 22 मार्चपासूनचे सर्वांचेच सण घरगुती आणि अतिशय मर्यादित स्वरूपात साजरे होत असल्याने, त्याचा थोडासा परिणाम यावर्षीच्या दिवाळी सणावरही जाणवणार आहे. मात्र, दिवाळीमध्ये सहसा धार्मिक कार्यक्रमांपेक्षा कौटुंबिक पातळीवर घ्यावयाच्या आनंदाचे प्रमाण मोठे असल्याने, आता यावर्षीच्या दिवाळीमध्ये सर्वांच्याच चेहऱ्यावर (अनेक दिवसांनंतर) दिवाळी साजरी करता येत असल्याच्या आनंदाची भर पडणार आहे.

“प्रभात’ने हाच विचार डोळ्यापुढे ठेवून यावर्षीच्या दीपोत्सव विशेषांकाची योजना केली आहे. “कोविड’नंतरच्या काळात जगभरच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असताना, त्याचे भारतावर काय परिणाम होतील, याविषयी अर्थतज्ज्ञ प्रा. अश्‍वनी महाजन यांचा लेख वास्तवाची सार्थ जाणीव करून देणारा आहे. या लेखातून चीनच्या साम्राज्यवादी धोरणाला कंटाळलेले जे देश चीनच्या विरोधात गेले किंवा जात आहेत, त्याचा लाभ भारताला कसा होईल, याविषयी उहापोह केला आहे. 

“लोकसाहित्य आणि संस्कृती व त्यामधील स्त्री लावण्य प्रतिमा’ याविषयीचा डॉ. राजेंद्र माने यांचा लेख अभ्यासपूर्ण आणि संदर्भनिपुणही असल्याचे जाणवेल. ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास मेहेंदळे यांचा आठवणींचा कोपराही, शब्दाला जागणाऱ्या माणसांचे एक सुंदर चित्र रेखाटताना दिसतो. “लॉकडाऊन’च्या प्रक्रियेत सर्वच सिनेमा आणि नाट्यगृहे बंद होती, जी आताशा सुरू झाली आहेत. या बंदीमुळे मनोरंजनाचे विश्वही ठप्प झाल्यासारखे होते.

मात्र, “ओटीटी प्लॅटफॉर्म’ने या क्षेत्राला संजीवनी दिली आणि प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून दिला, याविषयी “बागी’ यांनी सखोलपणे लिहिले आहे. तसेच श्रीनिवास वारुंजीकर यांनी लिहिलेला, भारतीय सिनेसृष्टीतील सदाबहार आणि सदासतेज, हसतमुख नायिकांविषयीचा लेख तुम्हाला नक्की आवडेल. क्रीडा विभागासाठी अमित डोंगरे यांनी “द वॉल-राहुल द्रविड’ने घडवलेल्या शिलेदारांविषयी माहिती मिळेल.

“ज्ञानपीठ’विजेते दिवंगत कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या ‘दै. प्रभातमधील ते दिवस…’ या लेखाच्या प्रथम प्रकाशनाला यंदा 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तो लेख आम्ही वाचकांसाठी पुनर्मुद्रित करत आहोत. 

तसेच सुचित्रा पवार, मानसी चापेकर, अपर्णा कुलकर्णी, बबन पोतदार, ऍड. भाग्यश्री चौथाई, प्रशांत सातपुते, संपदा गणोरकर, वंदना धर्माधिकारी, डॉ. मेघश्री दळवी, प्रदीप बालगावकर आणि मनीषा लबडे-दहातोंडे यांच्या विविधरंगी कथा आपल्याला नक्कीच अंतर्मुख करतील. वसुधा सहस्रबुद्धे (बंगाली- रामनाथ राय) आणि विकास शुक्‍ल (फ्रेंच – गी. द. मोपॉंसा) यांनी अनुवादित केलेल्या कथाही अंकाच्या वेगळेपणात भर घालतील.

कोणताही दिवाळी अंक राशीभविष्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अनिता केळकर यांच्या भविष्य लेखनाचा अंतर्भावही प्रथेप्रमाणे आहेच. आपला दीपावलीचा आनंद शतगुणित व्हावा, याच केवळ हेतूने यावर्षी अंकाचे नियोजन केले आहे. या अंकाचे आपण स्वागत कराल, याची खात्री आहे. 

आमचे सर्व वाचक, जाहिरातदार, लेखक, चित्रकार आणि हितचिंतक यांना ही दीपावली आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीसह “कोविडमुक्त’ जाओ, ही सदिच्छा!
शुभ दीपवली.

आनंद गांधी, संपादक

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.