पिंपरी – एका महिलेने भागीदारीत सलून व्यवसाय करत असताना एका बड्या कंपनीची फसवणूक केली. सलून व्यवसाय सुरु करून कंपनीकडून 18 लाख 25 हजार रुपये घेतले. सलूनमधील मोबदला तसेच घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. याबाबत सलून चालक महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिभा प्रवीण वाघ (वय 35, रा. नवी मुंबई) यांनी याबाबत बुधवारी (दि. 11) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी काजल कैलास भोसले (रा. केशवनगर, चिंचवड) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 10 जून 2019 पासून 11 नोव्हेंबर 2020 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.
आरोपी काजल हिने फिर्यादी प्रतिभा यांच्यासोबत भागीदारीत सलून व्यवसाय सुरु केला. त्यासाठी आरोपी काजल हिने 18 लाख 25 हजार रुपये घेतले. त्यानंतर ग्राहकांकडून येणारा मोबादला दुकानाच्या खात्यावर जमा न करता तो पतीच्या खात्यावर जमा केला.
तसेच झालेल्या फायद्याचे पैसे आज देते, उद्या देते असे म्हणत टाळाटाळ केली. अशा प्रकारे आरोपी काजल हिने फिर्यादी आणि लॅक्मे कंपनीची फसवणूक केली.