मार्केटयार्डातील फळ विभागात नागरिकांची फळ खरेदीसाठी गर्दी
पुणे – मार्केटयार्डातील फळ विभागात गोड, आंबट चवीचे तब्बल 1 किलो 400 ग्रॅम वजनाचे हनुमान फळ दाखल झाले आहे. नागरिकांनी हे फळ खरेदीसाठी गर्दी केली होती.
येथील बाजारात रविवारी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातून हनुमानफळाची आवक झाली. मागील 15 दिवसांपासून या फळाची आवक होत आहे. सुरुवातीच्या काळात ही आवक तुलनेने कमी होती. मात्र, सध्या ती वाढली आहे. रविवारी (दि.10) 50 क्रेट इतकी हनुमानफळाची आवक झाली. एका क्रेटमध्ये 15 ते 16 किलो इतकी हनुमानफळे असतात. उच्च दर्जाच्या फळास घाऊक बाजारात 80 ते 100 रुपये, मध्यम दर्जाच्या फळास 50 ते 70 रुपये आणि दुय्यम दर्जाच्या मालास 40 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादन चांगले आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे मालाचा दर्जा उत्तम आहे. शहरासह उपनगरांतील स्टॉल विक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून या फळास मागणी होती.
याविषयी व्यापारी संतोष ओसवाल म्हणाले, हनुमान फळ हे रामफळ आणि सीताफळ यांच्या जातीतील एक फळ आहे. हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो. हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात. एका हनुमान फळाचे वजन 100 ग्रॅमपासून दीड किलोपर्यंत असते. एका झाडाला सुमारे 40 किलो वजनाची फळे लागतात. फळाचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो.
दोन एकर क्षेत्रात हनुमान फळाची लागवड केली आहे. येथील मार्केट यार्डात उत्पादीत हनुमानफळ आणतो. प्रतिकिलोस 100 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गेल्यावर्षी अडीच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले होते. यंदा त्यामध्ये वाढ होवून 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे
– नंदू आण्णा गवळी, शेतकरी, रा. राशीन, ता कर्जत