भोपाळ : (वरुंजीकर)- मध्यप्रदेशातील 52 पैकी 25 जिल्हयांमध्ये करोनाबाधित आढळून आले आहेत. इंदोरनंतर भोपाळची स्थिती देखील चिंताजनक होत चालली आहे. इंदोरच्या टाटपट्टी बाखलनंतर भोपाळच्या जहांगीराबाद भागातून 4 दिवसांत 5 हजार नमुने घेण्याचे लक्ष्य प्रशासनाने बाळगले आहे. जहांगीराबादमध्ये निजामुद्दीन मरकजमधून आलेल्या जमातींचा सर्वाधिक वावर होता. राज्यात 761 कोरोनाबाधित सापडले असून 53 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 45 जणांनी करोनावर मात केली आहे.
भोपाळमध्ये 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात 16 नवे रुग्ण आढळले आहेत. यात 6 पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. शहराच्या जहांगीराबादमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 3 जणांना जीव गमवावा लागला आहे. या भागात शिबिर आयोजित करून सुमारे 1 हजार लोकांचे स्राव नमुने घेण्यात आले आहेत. दिवसभरात 10 हजार लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले.
दिल्लीतून इंदोरमध्ये दाखल झालेले 9 जण मदरशात राहत होते. या 9 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या 9 जणांमध्ये 2 अल्पवयीन, एका वृद्धाचा समावेश आहे. महूमध्ये 7 दिवसांनी एकाचवेळी 6 कोरोनाबाधित आढळले आहेत. यात जमातचे 4 जण तर एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी तसेच घरातील कामगाराचा समावेश आहे. इंदोरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 569 वर पोहोचली आहे. तर भोपाळमध्ये 160 रुग्ण सापडले आहेत. राज्यातील 52 पैकी 25 जिल्हयांमध्ये संसर्ग पोहोचला आहे. नव्या जिल्हयांमध्ये टाळेबंदीमुळे रुग्ण आढळून येत असल्याने समूह संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. सरकारने आता समूह संसर्ग रोखण्याच्या धर्तीवर तयारी सुरू केली आहे