पाच दिवसांची कोठडी; अडीच तोळे सोने हस्तगत
सातारा – सोन्याचे दागिने तयार करून देण्यासाठी शहरातील सराफाकडून घेतलेले 15 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने घेऊन बिहारमधील दोन कारागीरांनी पोबारा केल्याची घटना गेल्या आठवड्यात शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळमधून दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच तोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
उमेश रमेश घोडके (रा. कोटेश्वर मैदानानजीक, सातारा) यांचे शनिवार पेठेत दागिन्यांचे दुकान आहे. गेल्या वर्षी निसार शेख खान व प्रभुदेवा हे कामगार त्यांच्या संपर्कात आले होते. तेव्हापासून घोडके हे या दोन कारागीरांकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते. या जोडगोळीने वर्षभरात घोडके यांच्यासह सराफ बाजारातील अन्य काही व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. या परप्रांतीय कारागीरांनी व्यापाऱ्यांच्या विश्वासाला तडा दिला.
घोडके हे गेल्या आठवड्यात शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुकानात आले. त्यांनी दागिने बनवण्यासाठी निसार खान व प्रभुदेवा यांच्याकडे अर्धा किलो सोने दिले. त्यानंतर घरी गॅस सिलिंडर आणायचा बहाणा करत घोडके यांना सांगून निसार शेख दुपारच्या सुमारास निघून गेला. त्यानंतर काही वेळाने पोटात दुखत असल्याचे कारण सांगून प्रभुदेवा हादेखील निघून गेला. दोघेही सायंकाळपर्यंत परत न आल्याने घोडके यांना संशय आला. ते दोघांच्या खोलीवर गेले असता तेथे दाराला कुलूप होते. घोडके यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते स्विच ऑफ लागल्याने घोडके यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मध्य प्रदेशात जाण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या पथकाने सातारा बसस्थानक, स्वारगेट व पुणे रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर भोपाळ येथे जाऊन या पथकाने दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.