अहवाल पॉझिटिव्हनंतर न डगमगता दहा दिवसांत आजारावर मात
हडपसर – हडपसर येथील 89 वर्षीय शेडगे अक्का यांनी करोना रोगावर मात केली आहे. वयाच्या 89 वर्षीदेखील सतत उत्साही असणाऱ्या अक्कांनी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही न घाबरता या रोगाचा सामना केला. त्या आता ठणठणीत बऱ्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. पुणे शहरातील सर्वात ज्येष्ठ करोनामुक्त रुग्ण अक्का ठरल्या आहेत.
हडपसर येथील अक्का यांच्यावर खासगी रुग्णालयात गेली दहा ते बारा दिवस उपचार सुरू होते. रुग्णालयातील डॉक्टर तसेच परिचारिकांचे अक्कांनी आभार मानले. अक्कांचे त्यांच्या घरी आगमन झाल्यानंतर प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, विशाल वाळके आदींनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी जवळपास तीन महिने संपूर्ण भारत बंद आहे. करोना जीवघेणा रोग नाही; परंतु यावर ठोस औषध आलेले नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक गोंधळून जातात. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य वेळेत योग्य उपचार घ्यावेत. शेडगे अक्कांनी 89 व्या वर्षांत या रोगावर मात करीत हे दाखवून दिले आहे.