हडपसर : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवार ( दि २४ जून ) योगिनी एकादशीला हडपसर मध्ये विसावतो आहे. या सोहळ्यासाठी विसावा मंडप, पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, कोव्हीडच्या नियमाचे पालन, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पध्दतीने उपलब्ध करून देण्यासह हडपसर मधील पालखी सोहळा सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश आमदार चेतन तुपे पाटील यांनी दिले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या हडपसर येथे विसावा घेतात. तब्बल दोन वर्षांनी पंढरीच्या वाटेवर निघालेल्या या दोन्ही पालख्यांचे आगमन हडपसर मध्ये शुक्रवारी ( दि २४ जून ) योगिनी एकादशीला
होणार आहे. त्याचे नियोजन व पूर्वतयारी आढावा बैठक आमदार चेतन तुपे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज हडपसर क्षेत्रीय कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील , महापालिका उपायुक्त संदीप कदम, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे,परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश भेंडे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सुभाष पावरा, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, योगेश ससाणे, सुनिल बनकर, विजय देशमुख, गणेश ढोरे, पूजा कोद्रे आदिंसह हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
“यंदाच्या वारी सोहळ्यासाठी वारकरी भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.त्यासाठी आवश्यक सुविधा, अतिरिक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसोबत समन्वय आदि विषयांवर सविस्तर चर्चा यावेळी झाली. दोन्ही पालख्यांसोबत येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी अनेक व्यक्ती, संस्था जेवण, फळे वाटप करून सेवा देतात त्यांनी याबाबत हडपसर क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधून परवानगी घ्यावी व आवश्यक नियमांचे पालन करावे. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा, लसीकरण, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहे. याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. २२ ते २४ जून कालावधीत हडपसरला अतिरिक्त पाणीपुरवठा करणे, फिरते शौचालय, भाविकांसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणे या सुविधा करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही पालखी विसावा ठिकाणी मंडपाच्या खर्चासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येईल.”
– चेतन तुपे पाटील( आमदार, हडपसर विधानसभा)
“पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी येताना सर्वांनी आपली सुरक्षितता पाळायची आहे. खासकरून महिलांनी जास्तीचे दागदागिने घालून तसेच सोबत कोणत्याही प्रकारची पिशवी बाळगू नये. काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.दर्शनासाठी येताना शक्यतो सर्वांनी मास्कचा वापर करावा.”
– नम्रता पाटील(पोलीस उपायुक्त)
“महापालिकेतील ८५० आरोग्य कर्मचारी घेऊन सासवड रोडवर वडकी विसावा तसेच सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल नाक्यापर्यंत तीन दिवस साफसफाई करण्यात येणार आहे. गाडीतळ येथील दोन्ही पालखी विसाव्यांची दुरुस्ती करून रंगरंगोटी व त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. दोन्ही पालखी मार्गावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवण्यात येत आहे. फिरते आरोग्य पथक असणार आहेत.पालखी मार्गावर व दिंडीच्या मुक्कामांच्या २३ ठिकाणी १४९ फिरते शौचालय ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.”
– प्रसाद काटकर( सहाय्यक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय)