लाहोर – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्याविरोधात लाचखोरी, मनी लॉन्डरिंग आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा निर्वाळा लाहोरमधील विशेष न्यायालयाने दिला आहे.
शाहबाझ शरीफ आणि त्यांचे पुत्र आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री हमजा शाहबाझ यांच्याविरोधातील 16 अब्ज रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निर्वाळा दिला. या प्रकरणात हमजा शरीफ आणि शाहबाझ शरीफ यांना अटक करण्यामागे फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा दुषित हेतू असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
शाहबाझ शरीफ आणि हमजा शरीफ हे दोघेही “एनएबी’च्या कोठडीमध्ये असतानाच “एफआयए’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. “एफआयए”ने या दोघांचीही गेल्या वर्शी डिसेंबरमध्ये आणि या वर्षी जानेवारीमध्ये दोनवेळा चौकशी केली आहे. त्यानंतर पाच महिन्यांपर्यंत “एफआयए’ने या दोघांची चौकशी केलेली नाही. मात्र “एनएबी’च्या कोठडीतून या दोघांची सुटका झाल्यानंतर लगेच “एफआयए’ने या दोघांना चौकशीसाठी बोलावले. यावरून या दोघांना अटक करणे हाच “एफआयए’चा उद्देश होता., असे लक्षात येते, असे न्यायालयाने म्हटले आहे.