पुणे – महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. महामेट्रोने आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. महामेट्रोने दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प विकास आराखडा महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी सादर केलेला आहे. परंतु, पालिकेने त्याला मंजुरी दिलेली नाही. दुसऱ्या टप्प्याला विलंब होऊन पुढील नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना महामेट्रोच्या दुसऱ्या टप्यात हडपसर मेट्रोचा उल्लेखच नसल्याने यात नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
महापालिका आणि पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) एप्रिल 2022 मध्ये झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर पहिल्या टप्प्यातील काम झाल्यानंतर महामेट्रोकडून हडपसरपर्यंत आणि त्यापुढे लोणी काळभोरपर्यंत मेट्रो नेण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. त्यानुसार शहरालगतच्या वनाज, कोथरूड, सिंहगड रोड आदी भागात मेट्रोचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी मेट्रोची यशस्वी चाचणीही करण्यात आली. आता, पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत असताना महामेट्रोकडून दुसऱ्या टप्प्यातील कामाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, नळस्टॉप ते माणिकबाग असा उल्लेख आहे. या दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा 26 सप्टेंबर 2022 मध्ये महामेट्रोने पालिकेकडे सादर केला आहे. परंतु, पालिकेने त्यामध्ये काही शंका उपस्थित केल्या आहेत, त्यानुसार महामेट्रो आणि महापालिका यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील कामाचा प्रकल्प विकास आराखडा मंजूर करून त्यानंतर राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवून अंतिम मंजुरी घेणे गरजेचे होते. परंतु, आठ महिने उलटूनही याबाबतचे काम संथगतीने सुरू आहे.
मंजुरी प्रक्रिया रेंगाळली…
महामेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असताना संपण्याआधी दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणे गरजेचे होते. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 20 व राज्य सरकार 20 टक्के निधी आणि उर्वरित 60 टक्के निधी महामेट्रोला जागतिक पातळीवरील वित्तीय संस्थांकडून कर्जाऊ उभारावा लागत असल्याने मेट्रोच्या मंजुरीची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असते. दुसऱ्या टप्यातील कामाचे सदर नियोजन सुरू असले तरी पूर्ण होणे गरजेचे होते.