मंचर, घोडेगावात दुकानदारांकडून डिस्काउंट जाहीर : पालकांमधून नाराजीचा सूर
मंचर – गेल्या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने मंचर आणि घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे स्टेशनरी दुकानात विविध शालेय साहित्य घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शालेय साहित्यांच्या किमतीत मोठया प्रमाणात वाढ झाली असून, किमतीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मंचर, घोडेगाव येथे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी डिस्काउंट जाहीर केला आहे. मात्र वह्या-पुस्तकांसह शाळेसाठी लागणारे दप्तर, रंगपेटी यांसह सर्वच साहित्यांच्या दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे अनेक पालक सांगत आहेत.
पालक विद्यार्थ्यांनी आपल्या दुकानातून साहित्य खरेदी करावे, यासाठी अनेक दुकानदारांनी साहित्य खरेदीवर सूट दिल्याचेही पाहावयास मिळत असून यामुळे पालकांच्या खिशाला थोडाफार आधार मिळत आहे.
पाच रुपयांना मिळणारा पेन 7 रुपयाला झाला असून, 250 ते 300 रुपयांचे दप्तर 400 ते 500 रुपयांना विक्री केली जात आहे. मागील वर्षी 50 रुपयांना मिळणारी मोठी वही 65 ते 70 रुपयांना मिळते आहे. स्टेशनरी व शालेय साहित्य घेताना पालकांना थोडाफार दिलासा मिळावा म्हणून आम्ही शालेय वस्तूंवर 7 ते 8 टक्क्यांची सूट दिली आहे.
– अनिल शिंदे, स्टेशनरी विक्रेते, मंचर