- केंद्रीय रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची भूमिका
पिंपरी – पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (एच.ए.) कंपनीत करोना लस निर्मिती करण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका सकारात्मक आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा पाठपुरावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. लवकरच लस निर्मितीसाठी निर्णय घेण्यात येईल. त्यासोबतच एच.ए. कंपनीला गतवैभव प्राप्त करून देण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, अशी भूमिका केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी (दि. 2) मांडली.
केंद्रीय राज्यमंत्री मांडवीय यांनी शुक्रवारी एच.ए. कंपनीला भेट दिली. एच.ए. कंपनीमध्ये प्रस्तावित करोना प्रतिबंधक लस निर्मितीला केंद्र सरकारने चालना द्यावी. त्याचा पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडला फायदा होईल, अशी मागणी या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली. त्या वेळी मांडविया यांनी ही भूमिका मांडली. एच.ए. कामगार संघटनेचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मांडविया यांना निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करोना प्रतिबंधक लस निर्मितीकरीता एच.ए. कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लस निर्मितीसाठी परवानगी द्यावी. कंपनी व्यवस्थापन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. लस उपलब्धतेअभावी पिंपरी-चिंचवडसह राज्यात काही वेळा लसीकरण बंद करावे लागते. पुरेसा साठा नसल्यामुळे लसीकरण केंद्रासमोर रांगा दिसतात. यामुळे एच.ए. कंपनीत लस निर्मिती होणे नागरिकांच्या हिताचे आहे. रेमडेसिविर इंजेक्शन, ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी अँफोटेरिसीन-बी इंजेक्शनही कंपनीत निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लस निर्मितीसाठी आवश्यक परवानगी तात्काळ द्यावी.