नवी दिल्ली – मोठ्या कर्जाचे ओझे असलेल्या पुण्यातील डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स म्हणजे डीएसके या कंपनीला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांची बैठक शनिवारी होणार आहे. डीएसकेच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी काही बोली आल्या आहेत. या बोलीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स कंपनीने शेअर बाजाराला कळलेल्या माहितीत म्हटले आहे की, शनिवार, दिनांक 3 जुलै रोजी कर्ज देणाऱ्या संस्थांच्या समितीची बैठक होणार आहे.
नादारी व दिवाळखोरी सहितेअंतर्गत झालेल्या कारवाईनंतर तीन खरेदीदारांनी बोली लावली आहे. त्यामध्ये मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स आणि सॉलीटायर समूहाचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
ही प्रक्रिया सुरू करण्याची सूचना सप्टेंबर 2019 मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने दिली होती. ही प्रक्रिया नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र बॅंकेने अर्ज केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालमत्ता खरेदी करण्यासाठी तीन कंपन्यांनी इच्छा दर्शविली आहे. त्यांना शुक्रवारपर्यंत आपल्या अंतिम बोली बोलण्यास सांगण्यात आले असून त्यावर तीन जुलै रोजी चर्चा होणार आहे.
असे समजले जाते की, मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स आणि सॉलीटायर समूहाने डी एस कुलकर्णी यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी इच्छा दर्शविली आहे. तर एका तिसऱ्या कंपनीने फक्त एका प्रकल्पाला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार विविध देणेकऱ्यांना 1,750 कोटी रुपयांचे येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये बारा बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांचे 1,050 कोटी रुपये आहेत. या प्रकरणात संस्थागत वित्तीय संस्थांना 66.7 टक्के इतका मतदानाचा अधिकार आहे. तर घर खरेदी करणाऱ्यांना आणि ठेवीदारांना मतदानाचा 17 टक्के अधिकार आहे.