मुंबई – दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. खास करून महिला वर्गाचा या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारे असले तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. यामुळेच आता केदार शिंदे पुरूषांसाठी खास ऑफर घेऊन आले आहेत.
आता पुरुष वर्गाला बाईपण भारी देवा चित्रपट 100 रुपयात पाहता येणार आहे. याबाबत केदार शिंदे यांनी इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या त्यांनी लिहिले की, ‘हा सिनेमा “तिने” डोक्यावर घेतला. पण खरंतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तिचे मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तिचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय….’ येत्या 11 ऑगस्टपासुन बाईपण भारी देवा कोणत्याही थिएटरमध्ये फक्त 100 रुपयात पाहता येणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बाईपण भारी देवा चित्रपटाने 80 कोटींचा गल्ला पार केला आहे. तर या ऑफरमुळे चित्रपट 100 कोटींचा गल्ला देखील लवकर पार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चित्रपटात सहा बहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या ‘वेड’नंतर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद आहे.