Junior NTR Film | दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर ‘देवरा पार्ट 1’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यातच आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे झळकणार आहे.
श्रुती मराठेने याआधी तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता तिला हा महत्वाचा प्रोजेक्ट मिळाला आहे. या सिनेमात श्रुती ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयीस सांगताना ती म्हणाली की, “गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतले ढोल वादनाचे फोटो मी पोस्ट केले होते. ते बऱ्यापैकी व्हायरल झाले. मी जेव्हा देवराच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटले तेव्हा त्यांनी माझ्या या फोटोंचं कौतुक केलं. त्यांना आपल्या विसर्जन मिरवणूक आणि ढोल पथकाचं खूप कुतुहल वाटत होतं. ज्युनिअर एनटीआरलाही माझे फोटो आवडले,” असे तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
View this post on Instagram
ती पुढे म्हणाली, “हा माझा पहिलाच तेलुगू सिनेमा आहे. त्यामुळे मनात धाकधुक होती आणि भाषेचीही अडचण होती. पण मला टीमने सांभाळून घेतलं. ते मला देवनागरीमध्ये लिहून द्यायचे. मी ते पाठंतर करून शूट करत असे. माझे जास्त सीन्स हे ज्युनिअर एनटीआरसोबत आहेत. शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला खूप भीती वाटत होती, पण त्यांनी मला सांभाळून घेतले,”असे तिने या चित्रपटातील अनुभव शेअर केला.
दरम्यान, श्रुती मराठेचा ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. यानंतर आता ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार असल्याने चाहते देखील तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.