नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन येथील आश्रमाला भेट दिली होती. मात्र, त्यांच्या या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर वादंग निर्माण करण्यात आले आहे. शाह रवींद्रनाथ टागोर यांच्या खुर्चीवर बसल्याचा दावा काही लोकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवरमी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला नाही. कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि दिवगंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जिथे बसले अगदी तिथेच मी बसलो होतो, असा खुलासा शाह यांनी संसदेत केला.
कॉंग्रेस, टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावरुन अमित शाह यांच्यावर सोशल मीडियावर निशाणा साधला होता. कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या मुद्द्यावरुन लोकसभेत शाह यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर शाह यांनी संसदेत काही फोटो सादर करत स्पष्टीकरण दिले.
अधीर रंजन चौधरी यांनी माझ्यावर अशाप्रकारचे आरोप केले, यामध्ये त्यांची चूक नाही. खरंतर ही कॉंग्रेस पक्षाचीच समस्या आहे. मी गुरुदेव यांच्या खुर्चीवर बसलो नाही. मात्र, दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु रवींद्रनाथ टागोर यांच्या खुर्चीवर बसल्याचे काही फोटो माझ्याजवळ आहेत. राजीव गांधी देखील गुरुदेवांच्या सोफ्यावर बसून चहा पिताना दिसत आहेत. हे ऑन रेकॉर्ड आहे. प्रणव मुखर्जी, राजीव गांधी जिथे बसले अगदी तिथेच मी बसलो होतो, असे अमित शाह म्हणाले.
संसदेत जेव्हा आपण एखादा मुद्दा ठेवतो तेव्हा त्या मुद्द्याची आधी पडताळणी करुन घ्यावी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी संसदेत मांडल्यात तर संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. अधीर रंजन चौधरी यांची कॉंग्रेसची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्या मनात गैरसमज असू शकतात. त्यामुळे मला हे फोटो सभागृहाच्या पटलावर ठेवायची आहेत, अशा शब्दात अमित शाह यांनी कॉंग्रेस नेत्यांना सुनावले.