लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद, ता. खंडाळा येथील बाळूपाटलाचीवाडी येथील सूरज बापूराव धायगुडे (वय 23) याचा दहा ते पंधरा जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. संशयितापैकी एकाच्या पत्नीला मेसेज करत असल्याच्या कारणावरून ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राघू धोंडिबा धायगुडे यांचा पुतण्या सूरज बापूराव धायगुडे (वय 23, रा. बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा) यास काल (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास रोहित धनावडे याने यामाहा मोटारसायकलवर बसवून लोणंद येथील समाधान ढाब्यावर नेले.
तेथे रोहित धनावडे, राकेश माने, गणेश भालेराव, ढाबामालक मंगेश (आबा) क्षीरसागर, त्याचा भाऊ राजेश, कामगार योगेश कांबळे आणि इतर सात ते आठ जणांनी सूरजच्या हातावर, पायावर व पोटावर लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. राजेश क्षीरसागरच्या पत्नीला मेसेज करत असल्याच्या कारणावरून ही मारहाण झाली. यात गंभीर जखमी झालेल्या सूरजला मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास लोणंद एसटी स्टॅंडसमोर आणून टाकले.
तेथून सूरजला उपचारासाठी पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जात असताना, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राघू धोंडिबा धायगुडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
ही घटना समजताच पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन लोणंद पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. सपोनि सचिन राऊळ, गणेश माने, हवालदार महेश सपकाळ, दत्ता दिघे, ज्ञानेश्वर मुळीक, विठ्ठल काळे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, फैयाज शेख, शशीकांत गार्डी हे संशयितांचा शोध घेत आहेत.