चलनातून बाद झालेल्या 2 हजारांच्या नोटा बदलण्यास बॅंकांचा नकार
दुबई – भारत सरकारने 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जेंव्हा जाहीर केला तेंव्हापासून आखाती देशांमधील भारतीयांना प्रचंड त्रास व्हायला लागला आहे. नोटा चलनातून बाद केल्या जाणार असल्याच्या निर्णयाची माहिती बॅंक यंत्रणांनाच माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रिझर्व बॅंकेने 19 मे रोजी 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र नागरिकांना नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधीही देण्यात येणार असल्याचे रिझर्व बॅंकेने म्हटले आहे. बॅंकांनी 2 हजारांच्या नोटा वितरीत करणे त्वरित थांबवण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही रिझर्व बॅंकेने म्हटले होते.
मात्र संयुक्त अरब अमिरीतीतील भारतीयांना आपल्याकडील 2 हजारांच्या नोटा बॅंकेतून बदलण्यास अडचणी येत आहेत. तात्पुरत्या कारणासाठी दुबईमध्ये गेलेल्या भारतीयांना नोटबंदीबद्दल समजल्यावर त्यांनी बॅंकेतून नोटा स्थानिक चलनात मिळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यासाठी नकार मिळाला. भारतीय चलनातील 2 हजारांच्या नोटा बदलल्या जाऊ नये, अशी व्यवस्थापनाची स्पष्ट सूचना असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आखाती देशांमधील अनेक भारतीयांना “एक्सचेंज सेंटर’मधून 2 हजारांच्या नोटा बदलून मिळत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंनी आपल्याबरोबर 2 हजाराच्या नोटेऐवजी 500 रुपयांच्या नोटा आणाव्यात, असे आवाहन एका भारतीयाने सोशल मीडियावर केले आहे.
अनेक भारतीयांना 2 हजाराच्या नोटा बदलता येत नाहीत, असे अनिवासी भारतीय उद्योजक चंद्रशेखर भाटिया यांनीही म्हटले आहे. सुटीच्या हंगामात खर्चासाठी या 2 हजाराच्या नोटा निरुपयोगी ठरत आहेत, असे ते म्हणाले. बॅंका आणि वित्तीय संस्थांना या निर्णयाबद्दल आगोदरच कळवले गेले असते, तर ही स्थिती झाली नसती असे एका उद्योजकाने म्हटले आहे.