Gujrat Results – नुकत्याच झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसह दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले. गुजरात, हिमाचल व दिल्ली महापालिकेत भाजप सत्ताधारी पक्ष असल्याने लोकसभा निवडणुकांपूर्वी होत असलेल्या या महत्वपूर्ण निवडणुकांमध्ये सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर होते. दिल्ली महापालिकेसह गुजरातेत आम आदमी पक्षाने संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवली. तर हिमाचल प्रदेशात भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होम टर्फ मानल्या जाणाऱ्या गुजरातेत भाजपने रेकॉर्ड विजय मिळवला, आम आदमी पक्षाने खाते उघडले तर काँग्रेसची धूळधाण झाली. गुजरातेत दणक्यात सत्ता राखलेल्या भाजपला दिल्ली महापालिका व हिमाचल प्रदेशमध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते गुजरातमध्ये तळ ठोकून होते. तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसबभा निवडणुकांच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. काँग्रेस मात्र या निवडणुकांबाबत उदासीन असल्याचेच पाहायला मिळाले. याचेच प्रतिबिंब निवडणूक निकालांमध्ये उमटले आहे.
विशेष म्हणजे, २०१७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने गुजरातची निवडणूक चुरशीची केली होती. त्यावेळी काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र काँग्रेसच्या वाट्याला ६० जागा कमी आल्याचे दिसतंय.
काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये देखील मोठी घट झाली असून पक्षाला गुजरातेत जवळपास २८ टक्के मतं मिळाली आहेत. तुलनेत भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली असून यावरून भाजपने केवळ जागांच्या बाबतीच नव्हे तर मतांच्या टक्केवारीतही मोठी मुसंडी मारली आहे.
दुसरीकडे आम आदमी पक्षाने गुजरातेत खाते खोलले असून त्यांच्या वाट्याला ५ जागा आल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाच्या झोळीत जनतेने तब्बल १३ टक्के मतं टाकली आहेत. गुजरातेत पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षासाठी हे यश निश्चितच प्रेरणा देणारे ठरणार आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या घरामध्ये घेरण्याची संधी गुजरात निवडणुकांमुळे विरोधकांना होती. मात्र विरोधकांनी ही संधी देखील आपल्या हातून गमावली आहे. प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणाऱ्या भाजपने याही निवडणुकीत आपली यंत्रणा उभी केली होती. गुजरातेत भाजपला रेकॉर्ड विजय मिळाला मात्र दिल्ली महापालिका व हिमाचल प्रदेशमध्ये या पक्षाची पीछेहाट झाल्याचे दिसले.