अहमदाबाद – गुजरातचे मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांची विधानसभेवरील निवड मंगळवारी रद्दबातल ठरवण्यात आली. निवडणुकीत चुडासमा यांच्याकडून गैरप्रकार झाल्याचे मान्य करत गुजरात उच्च न्यायालयाने तो निर्णय दिला. त्या दणक्यामुळे गुजरातमधील भाजप सरकारची नाचक्की होणार आहे.
गुजरातमधील भाजपचे महत्वाचे नेते असणारे चुडासमा शिक्षण, विधिमंडळ कामकाज, कायदा आणि न्याय यांसारखी महत्वाची खाती सांभाळत आहेत. ते गुजरातेत 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी अवघ्या 327 मतांच्या फरकाने कॉंग्रेसचे उमेदवार अश्विन राठोड यांचा पराभव केला. राठोड यांनी चुडासमा यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.
चुडासमा यांनी निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला. निवडणूक आयोगाच्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले. त्याशिवाय, मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्याने मार्गदर्शक तत्वांचा भंग केला, अशा आरोपांची सरबत्ती याचिकेतून करण्यात आली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने चुडासमा यांची निवड रद्द ठरवली. तो निकाल चुडासमा यांच्याबरोबरच गुजरातमधील सत्तारूढ भाजपसाठी हादरा ठरला आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालाला चुडासमा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे समजते.