यंत्रणेच्या नेभळटपणावर संताप
सुरत : गुजरातचे आरोग्य मंत्री कुमार कनानी यांच्या मुलाला रात्रीची संचारबंदी मोडल्याबद्दल आणि मास्क न वापरल्याबद्दल जाब विचारणाऱ्या महिला पोलीस सुनीता यादव यांची काही तासातच बदली झाली. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ही घटना घडली तेंव्हा यादव यांनी त्यांच्या वरिष्ठांना घटनास्थळावर बोलावले होते. त्यावेळी वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई न करता यादव यांनाच घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितले होते. त्यानंतर काही तासातच त्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.
दरम्यान, मंत्र्यांच्या मुलाची या महिला पोलिसाची झालेली वादावादीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे सुरत पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा वादाचा प्रकार घडला. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त आर. बी ब्रह्मभट्ट यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
मोटारीतून फिरणाऱ्या चार मुलांना रात्री संचारबंदी असल्याने यादव यांनी अडवले. त्यांनी प्रकाशला दूरध्वनी करून बोलावले. त्याने येताच या महिला पोलिसाला शिविगाळ करण्यास सुरवात केली.
कनानी यांनी मात्र आपल्या मुलाची बाजू उचलून धरली आहे. प्रकाश हा सासरे शासकीय रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना पाहण्यासाठी जात होता. त्यावेळी या महिला हवालदाराने त्याला अडवले. आपल्याला जाऊ द्यावे म्हणून त्याने विनंती केली. मात्र, त्या पोलिसांनी त्याची बाजू समजून घेतली नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
वर्षभर इथेच उभे करेन
या ऑटिओ क्लिपमध्ये, एक पुरूष महिलेला मला अडवतेस जिथं थांबली आहेस तिथेच वर्षभर उभे करेन, असे म्हणत आहे. त्यावर चिडून ती महिला, मी काय तुझी गुलाम नाही. तुझ्या घरची नोकर नाही तु सांगशील तेथे उभी रहायला, असे खडसावत आहे.