राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात 24 तासांत 29 करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. 24 तासांत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात 399 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यातील 58 गावांमध्ये करोना संक्रमित झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खेड तालुक्यातील 5 पेक्षा जास्त करोना पॉझिटिव्ह व्यक्ती असलेल्या गावांमध्ये दहा दिवसांचे कडक लोकडाऊन करून संबंधित गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. खेड तालुक्यात चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे तालुक्यात लॉकडाऊनची मागणी केली जात होती. उद्यापासून काही कडक नियमांची अंमलबजावणी करून तालुक्यात तीन नगरपरिषदा आणि 18 गावांमध्ये लॉकडाऊन होणार आहे.
मागील 24 तासात तालुक्यात 29 पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याने तालुक्याने चार शतकांचा उच्चांक गाठला आहे. तर आतापर्यंत 9 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजगुरूनगर, चाकण आणि आळंदी नगर परिषदेच्या हद्दीत बाधित व्यक्ती वाढत आहेत. उद्यापासून या तीनगरपरिषद हद्दीत दहा दिवसांचा पूर्णतः लॉकडाऊन होणार आहे. तालुक्यातील संख्या वाढू नये, यासाठी प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत असून नागरिकांनी काळजी घ्यावी अटी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.