पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे ऑनलाइन अर्ज करण्यास पालकांना बुधवारपासून (दि.16) काही जिल्ह्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. “आरटीई’अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते.
यासाठी पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत 7 हजार 290 शाळांनी नोंदणी केली असून 80 हजार 545 एवढ्या प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. उर्वरित शाळांनीही तत्काळ नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी ऑनलाइन बैठक घेऊन सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना बजाविले आहेत.