मुंबई – राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिताला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील प्रमुख नेत्यांनीही सहभाग घेतला. ठिकठिकाणी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या कुटुंबीयांसोबत गोविंदबाग, बारामती येथे गुढी उभारली. ठाणे, डोंबिवली अशा ठिकाणी निघणाऱ्या शोभायात्रा या भागात प्रामुख्याने आकर्षणाचा विषय ठरतात.
या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. चित्ररथ सहभागी होतात. तरुणाईचा मोठा जल्लोष या शोभायात्रांमधून पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षीही शोभायात्रांमध्ये तोच उत्साह दिसला.
गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा काढण्यात आली होती. ज्यामध्ये नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचे स्वागत केले. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले होते. तसेच त्यांनी त्यांच्या नागपूरमधील निवासस्थानी गुढीचे पूजन देखील केले.
तसेच, डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेशाच्या पालखीचे पूजन श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भागशाळा मैदान येथून या नववर्षस्वागत यात्रेला सुरुवात झाली.
अंबादास दानवेंच्या शुभेच्छा!
नवीन वर्षात देशात लोकशाही राज्याची स्थापना होऊन केंद्रातील शासनात परिवर्तन व्हावे असा आशावाद प्रकट करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुढीपाडवा सणाच्या व हिंदू नववर्षाच्या देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाची देशात सुरु असलेलो हुकूमशाही संपून जनतेला आवश्यक शासन यावे अशी मनोकामना त्यांनी प्रकट केली.