टोकियो – मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या हेतूने तेथे आत्मसंरक्षक जहाज आणि विमाने पाठवण्याच्या प्रस्तावाला जपानच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजूरी दिली. या आत्मसंरक्षक जहाजांच्या माध्यमातून अभ्यास आणि संशोधन उपक्रम राबवले जाणार आहेत. याबरोबर विनाशिका आणि “पी3सी’ विमानेही मध्यपूर्वेमध्ये पाठवण्याबाबत जपान विचार करत आहे.
ही विनाशिका आणि विमाने सोमालियातील चाचेगिरीच्या विरोधात ओमानच्या आखातामध्ये, अरबी समुद्राच्या उत्तर भागात आणि एडणच्या आखातामध्ये वर्षभरासाठी तैनात केली जाणार आहेत. जपानला पुरवठा जाणारे 90 टक्के क्रूड तेल या आखाती प्रदेशतूनच आयात केले जाते. आत्मसंरक्षक जहाजे पर्शियन आखातामध्ये तैनात करण्याची कोणतीही योजना नाही, असे जपानच्यावतीने स्पष्ट करण्यात आले अहे.
जपानच्या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांना संरक्षण देण्याच्या हेतूने ही संरक्षक जहाजे मध्यपूर्वेमध्ये तैनात केली जाणार आहेत. या आत्मसंरक्षक जहाजांबरोबर शस्त्रसज्ज नौकाही तैनात केल्या जाणार आहेत. जपानचे अमेरिकेबरोबर सख्य आहे. इराणशीही जपानचे मित्रत्वाचे संबंध आहेत. आखाती सागरी भागातल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संरक्षक यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःची यंत्रणा राबवण्यास जपानने प्राधान्य दिले आहे.