नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यातील जीएसटी कलेक्शन 1 लाख 4 हजार कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या महिन्याइतकेच हे कलेक्शन आहे. गेल्या महिन्यात 1 लाख 5 हजार कोटी रुपये इतके कलेक्शन झाले होते. सन 2019 च्या नोव्हेंबर महिन्यातील कलेक्शनची तुलना करता या नोव्हेंबर महिन्यातील कलेक्शन 1.4 टक्क्यांनी अधिक आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये 1 लाख 3 हजार 491 कोटी रुपये इतके जीएसटी कलेक्शन झाले होते. त्याचप्रमाणे आयात मालावरून मिळणाऱ्या जीएसटीमध्ये यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 4.9 टक्के वृद्धी झाली आहे. तर अंतर्गत व्यवहारांतील जीएसटी कलेक्शनमध्ये 0.5 टक्के इतकी वृद्धी झाली आहे.
चालू वर्षी एप्रिल महिन्यात केवळ 32 हजार 132 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल मिळाला होता. त्यात दर महिन्याला थोडीथोडी वाढ होत गेली आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ होत असली तर भारताने आता तांत्रिकदृष्ट्या अधिकृतपणे मंदीच्या युगात प्रवेश केल्याने ही स्थिती सुधारण्यासाठी आणखी बराच कालावधी जाऊ द्यावा लागेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशाची वाढती वित्तीय तूट ही सुद्धा सरकारच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब मानली जात आहे.