पणजी – गोवा कॉंग्रेसचे विद्यमान आमदार फालेरिओ यांनी काल कॉंग्रेसचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केल्यानंतर आज महाराष्ट्रवाद गोमंतक पक्षाचे माजी आमदार लवू मामलतदार यांनीही आपल्या समर्थकांसह तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.
गोव्याची निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा तृणमूल कॉंग्रेसने केल्यानंतर त्यांच्या पक्षात आता तेथे इन्कमिंग सुरू झाले आहे. मामलतदार हे माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी 2012 ते 2017 या अवधीत फोंडा मतदारसंघातून विजय मिळवून आमदारकी भूषवली आहे.
आता आपण 2022 ची निवडणूक मडकईममधून लढवणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. तृणमूल कॉंग्रेसचे येथे अस्तित्व नाही, पण अनेक पक्षांचे लोक या पक्षात प्रवेश करीत असल्याने या पक्षाविषयी आता तेथे राजकीय कुतुहल निर्माण झाले आहे.