पुणे – करोना संकटकाळात वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ अखेर महापालिकेच्या रुग्णालयांना मिळण्यास प्रारंभ झाला आहे. चार रुग्णालयांतील 334 करोना बाधितांवरील उपचारांसाठी झालेल्या 1 कोटी 16 लाख रुपये खर्चाला या योजनेतून मान्यता मिळाली आहे. त्यापैकी 289 करोना रुग्णांवरील उपचारासाठी झालेल्या 25 लाख 31 हजार रुपये खर्चाची रक्कम महापालिकेला प्राप्त झाली आहे.
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवर पूर्णपणे नि:शुल्क उपचार सुविधा देण्याच्या उद्देशाने “एमजेपीजेएवाय’ योजना राबवली जाते. राज्य सरकारने दि.1 एप्रिलपासून करोना रुग्णांना या योजनेचा लाभ देण्याला सुरुवात केली. ससूनसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालये या योजनेशी संलग्न असून, तेथे दाखल रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत नोंदणीच केली नसल्याने या रुग्णालयांना याचा लाभ मिळत नव्हता. परिणामी, रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेला शहरी गरीब वैद्यकीय योजनेतून कोट्यवधी रुपये खर्चावे लागत होते.
महापालिकेची रुग्णालये आतापर्यंत “सिंगल स्पेशालिटी’ असल्याने; तसेच रुग्णालयात आयसीयू सुविधा नसल्याने या योजनेशी जोडण्यात आली नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात होता. मात्र आता ही रुग्णालये या योजनेच्या छत्रछायेखाली आली आहेत.