जम्मू,- भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये एक भुयार शोधले. आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही अंतरावर सांबा जिल्ह्यात ते आढळले. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी ते भुयार बनवण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दोन आत्मघाती हल्लेखोरांचा खात्मा केला. त्यांनी पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत शिरकाव केला होता. त्या घटनेनंतर बीएसएफने सीमेलगत भुयारे शोधण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेदरम्यान एक भुयार आढळले. सायंकाळच्या सुमारास त्या भुयाराजवळ बीएसएफचे जवान पोहचले.
लवकरच अंधार होणार असल्याने त्या भुयाराची पूर्ण तपासणी करण्यात आली नाही. आता उद्या सकाळी ती प्रक्रिया हाती घेण्यात येईल. त्यानंतर भुयाराविषयीचा अधिक तपशील देता येऊ शकेल, अशी माहिती बीएसएफच्या सुत्रांकडून देण्यात आली.
भुयार आढळल्यानंतर बीएसएफ अधिकच सतर्क झाले आहे. त्याशिवाय, इतर सुरक्षा यंत्रणांसाठीही ऍलर्ट जारी करण्यात आला असल्याचे समजते. संबंधित भुयारातून काही दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.