मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावत मुंबई इंडियन्सने सलामीवीर फलंदाज इशान किशनला खरेदी केले होते. मात्र, त्याला या स्पर्धेत सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत असल्याने सध्या त्याच्यावर टीका सुरू आहे. त्यातच हर्ष गोएंका या प्रख्यात उद्योगपतींनी 15 कोटींच्या ओपनरपेक्षा केवळ 69 रुपयांचे ओपनर चांगला ठरतो, असे टीकावजा गमतीदार ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
अर्थात त्यांनी हे ट्विट केल्यानंतर लगेचच हे ट्विट कोणा एकट्या खेळाडूवर नसून सध्या आयपीएल स्पर्धेत जवळपास प्रत्येक संघाचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करत नसून त्यांच्याबाबत केवळ गंमत म्हणून आपण हे ट्विट केल्याची सारवासारव गोएंका यांनी केली आहे.
यंदाच्या आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक 15.25 कोटी रुपये खर्च करत मुंबई इंडियन्सने इशानला खरेदी केले होते. मात्र, तो अपयशी ठरत आहे. तसेच देवदत्त पडीक्कलला 7.75 कोटी तर यशस्वी जायस्वालला 4 कोटींत खरेदी केले गेले. मुंबईसह विविध संघांतील सलामीवीर फलंदाजांना मोठी रक्कम देत संघांनी खरेदी केले.
मात्र, आता त्यांचे अपयशच संघांच्या सुमार कामगिरीचे कारण ठरत आहे. या सलामीवीरांवर कोटी कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा 69 रुपयांचा ओपनर सरस असतो, असे ट्विट करत गोएंका यांनी या खेळाडूंना चिमटा काढला आहे.