बिजिंग – चीनमध्ये गेल्या 61 वर्षांतील सर्वात तीव्र उन्हाळा आणि दुष्काळ पडलेला आहे. यामुळे वीज निर्मिती ठप्प झालेली असून देशावर वीजेचे संकट उभे राहिलेले असून अनेक शहरे ही अंधारात बुडालेली आहेत. वीजेची कमतरता असल्याने चीन सरकारने शॉपिंग मॉल्स केवळ पाच तास सुरु ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. शांघाईसारख्या शहरात दोन रात्री वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. फॉक्सवॅगन, ऍपल आणि टोयटोसारख्या कंपन्यांना त्यांचे प्लांटमधील काम बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे.
चीनमध्ये 18 ऑगस्ट रोजी सिचुआन प्रांतात चोंगक्विंग शहरात तापमान 45 अंशांवर पोहचले होते. चीनमधील वाळवंटी भाग असलेल्या शिनजियांग प्रांताच्याबाहेर आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. 20 ऑगस्ट रोजी चोंगक्विंग शहराचे किमान तापमान 34.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. चीनमधील हे सर्वाधिक किमान तापमान आहे. त्या दिवशी कमाल तापमान हे 43.7 अँश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आलेले आहे.
देशातील मध्य आणि दक्षिण-पश्चिम परिसरात सुमारे डझनभर शहरांचे तापमान हे 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलेले आहे. चीनमध्ये 165 शहरांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. येत्या काळी काळात या शहरांत किमान आणि कमाल तापमान 40अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वाढते तापमान पाहता नागरिकांनी घरातच राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.