ग्रेट पुस्तक : दृष्टी

अस्मिताच्या वाचकांना नमस्कार…

काही पुस्तकं आपल्याला खरोखर जगण्याची कला शिकवतात, जिद्द अन्‌ धैर्याने जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची इच्छाशक्‍ती निर्माण करतात. आज अशाच एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे जिथे दृष्टी नसूनही सृष्टी पाहिली जाते, चार अंध मुलांची धाडसी कहाणी… पुस्तकाचे नाव आहे “दृष्टी’ लेखक आहेत अनंत सामंत…

खरं अपंग व्यक्‍ती पाहिली की आपल्यासारखी बुद्धीने अपंग लोक त्यांना वारंवार त्यांच्यातील कमी नकळत दाखवत असतो. त्याचा त्यांना किती त्रास होत असेल याचा साधा विचारही आपल्या मनात येत नाही. त्यांच्यातील आत्मविश्‍वास खच्ची करण्याचा आपल्याला काय अधिकार? त्यांना सहानुभूतीची गरज नसते. ते इतरांसारखे जीवन जगू शकतात. अन्‌ हेच धाडस दाखवणारे चौघे अंध… अरुणी, सिद्धार्थ हे दोघे अन्‌ त्यांच्या मैत्रिणी कौमुदी अन्‌ निशा… अलिबागला, जंजिरा किल्ला पाहायच्या हेतूने घरातून सगळ्यांचा विरोध पत्करून प्रवासासाठी निघतात… अरुणी अन्‌ निशा हे एका अपघातात अंध होतात, तर सिद्धार्थ अन्‌ कौमुदी जन्मतः आंधळे असतात… अरुणीने या आधी अलिबाग पाहिलेले असते अन्‌ आजही तो ते समर्थपणे पाहू शकतो हे सिद्ध करण्यासाठी तो सगळ्या मित्रांना घेऊन तिकडे जायचे ठरवतो. या प्रवासात सगळे एकमेकांना छान सांभाळून घेतात. येणारे छोटे छोटे अडथळे एकमेकांच्या मदतीने पार पाडतात.

हसत खेळत प्रवास चालू होतो.पण अचानक पाऊस चालू होतो, वादळ, विजा निसर्गाचा थैमान चालू होतो. अनेकजण तिकडे न जाण्याचा त्यांना सल्ला देतात; पण ते हट्टाने, जिद्दीने पुढे प्रवास करतात. अलिबागमधील हॉटेलचे मॅनेजर त्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला देऊनही अरुणीला किल्ला पाहण्याची इच्छा असते. आपल्या अपंगत्वाकडे पाहून असे सल्ले दिले जात आहेत असा त्याचा समज होतो. निर्धाराने तो एकटा किल्ला पाहण्यासाठी निघतो; पण त्याला सोबत म्हणून कौमुदी त्याच्यासोबत निघते. दोघांची तिथपर्यंत जाण्याची धडपड, त्यांना भेटलेला रिक्षावाला अन्‌ गाईड यांच्या साहाय्याने ते किल्ल्यामधे प्रवेश करतात; पण समुद्र खवळलेला असतो. येताना ते त्या तुफानात फसतात. कोणीही आधाराला नाही, नेटवर्क बंद, अशा परिस्थितीत ते कसा मार्ग काढतात? ते सलामत बाहेर येतात की नाही? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे.

सुंदर पुस्तक, शेवट मनाला चटका लावणारा, अचानक अंधत्व आलेल्या अरुणी अन्‌ निशाच्या मनाची तगमग, कौमुदी अन्‌ अरुणीमधे निर्माण झालेले प्रेम, त्यांची एकमेकांना वाचवण्याची धडपड, निशा सिद्धार्थचे सहज आहे त्या जीवनाशी जुळवून घेणारा स्वभाव, कोणाच्या आधाराशिवाय आपण जगू शकतो हे सिद्ध करण्याची चौघांची सुप्त इच्छा. अंध व्यक्‍तीकडे असलेली डोळस माणसेही न पाहू शकणारी ही एक वेगळी शक्‍ती. छोट्या छोट्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करून सफाईदारपणे काम करण्याची लकब लेखकाने अचूक टिपली आहे. छोटेसे पुस्तक आहे; पण खूप धैर्य देऊन जाते, जगाकडे वेगळ्या नजरेतून पाहू शकतो, तुमचाकडे आत्मविश्‍वास असेल तर अशक्‍य काहीच नाही हेच या पुस्तकातून लेखकाला सांगायचे आहे.

काही वर्षांपूर्वी रायगडवरील मुक्‍कामास लेखक गेले असताना त्यांना तिथे चार अंध मुले भेटली अन्‌ त्यांच्या लक्षात आले की, अंध लोक फक्‍त किल्लेच बघत नाहीत, तर ते सामान्य जीवनही जगतात. त्यातून ही कथा पुढे साकार झाली. संदीप खरे यांच्या आवाजात अभिवाचन सीडी रूपात उपलब्ध आहे. सागराच्या रौद्र तांडवास, निसर्गाच्या असुरी थयथयाटास दोन अंधांनी नियतीशी घेतलेल्या झुंजीची कहाणी नक्‍की वाचा. याचे प्रकाशन डिंपल पब्लिकेशन यांनी केले आहे. लवकरच नवीन अभिप्राय घेऊन भेटेन.

धन्यवाद!

– मनीषा संदीप

Leave A Reply

Your email address will not be published.