सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची लूट

सातारा – साताऱ्यात येथील सेतू कार्यालयातून विद्यार्थ्यांना महिना होऊनही दाखले मिळत नसताना एजंट मात्र पाचशे रुपयांत दाखला देण्याची हमी देऊन सर्वसामान्यांकडून पैसे उकळत असल्याची सद्यस्थिती आहे. दाखले देण्यासाठी एजंट खुलेआम पैशांची मागणी करत असताना तहसील प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. या प्रकारामुळे पालक मेटाकुटीला आले असून या प्रकाराला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.

सातारा तहसील कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांमार्फत सेतूतून दाखल्यांचे वाटप केले जाते. मात्र दाखले देताना दलालांची मोठी टोळी सक्रीय आहे. दाखल्यांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. प्रशासनाच्या आशीर्वादामुळे सेतू कार्यालयात ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. त्याचा मोठा फटका विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागत आहे. शाळा व महाविद्यालयांचे प्रवेश सुरू झाल्याने विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी सेतू कार्यालयात मागील आठवड्यापासून विद्यार्थी व पालक गर्दी करत आहेत.

ऍफिडिव्हिटसाठी शंभर रूपये, लिखापढीचे पन्नास रुपये, प्रत्येक कागदासाठी दहा रुपये थेट दाखला हवा असेल तर पाचशे ते हजार रुपये मोजायची तयारी असेल तर दाखलाही लगेच मिळतो. प्रशासनातले शुक्राचार्य आणि काही खाजगी एजंटांनी येथे दाखल्याचा सशुल्क बाजार मांडला आहे. विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्यासाठी तीन महिने अगोदर अर्ज केले आहेत. मात्र, दाखल्यावर स्वाक्षऱ्या न झाल्याचे कारण पुढे करून सेतूतील कर्मचारी दाखले देत नाहीत. त्यामुळे तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात दाखले पडून आहेत.

एकीकडे तीन-तीन महिने दाखले मिळत नसताना दुसरीकडे एजंट मात्र पाचशे रुपयांत दाखला देण्याची हमी देताना दिसतात. सेतू कार्यालयातील एजंट खुलेआम विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक करत असताना प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले आहे. अनेक चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्ज केल्यानंतर महिन्याभरात दाखले देणे बंधनकारक आहे. मात्र, दाखल्यांवर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या न झाल्याने तीन-तीन महिने दाखले मिळत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.