कृतज्ञतेचा श्रावणोत्सव

“उत्सव प्रिय खलु मनुष्य:” असे महाकवि कालिदासाने यथोचितच म्हटले आहे. उत्सव, सण आपल्याला आवडतात कारण आपल्या रुक्ष जीवनातून ते आपल्याला मुक्ती देतात. जीवनातल्या जडतेला मोकळे आभाळ मिळते. भारतीय संस्कृती ही पुस्तकांच्या पानांत नव्हे; तर जिवंत उत्सवात दडलेली आहे. ही संस्कृती आपल्याला सर्व मानव व मानवतेवर जगाकडे प्रेमाने पहावयास शिकवते. नुकतीच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली. पौर्णिमा ते अमावस्या या पंधरवड्यात नंतर येते ती आषाढ अमावस्या. ज्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो व पवित्र मानल्या जाणाऱ्या “श्रावण’ या मराठी महिन्याची सुरवात होते. हा महिना म्हणजे अनेक सणांचा जणू हारच. प्रत्येक फुल कोणत्यातरी कृतज्ञतेच्या भावनेची जणू काही साक्षच!

आपल्या संस्कृतीने पशु-पक्षी, वृक्ष, सर्वांशी आत्मियतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गाईची पूजा, कोकिळा व्रत, वटपौर्णिमा, बैलपोळा तसेच याच श्रावण महिन्यात येते ती “नागपंचमी’. या दिवशी नागपूजन केले जाते. म्हणजे आपण प्रत्येकाशी असलेले नाते या सणांच्या निमित्ताने वृद्धिंगत करत असतो. खरं तर नागविषयी भीती सर्वांनाच असते. आपण त्याला घाबरत असतो कदाचित या भीतीपोटीच नागपुजा सुरू झाली असावी. “आमचे रक्षण कर नागदेवता,’ हीच भावना असावी. पावसाचे आगमन याच काळात होते. पावसामुळे निद्रिस्त झालेल्या नागदेवतेला घरात अतिथी बनून त्याचे पूजन करणे हे आपण आपल्या हितासाठी कर्तव्य मानून नागपंचमी साजरी करत असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नंतर येते ती “शितलासप्तमी’. श्रावण शुद्ध व वद्य या दोन्हींना आपण “शितलासप्तमी’ म्हणतो. यादिवशी स्त्रिया साधन पूजा करतात. जसे चूल किंवा गॅसशेगडी याची पूजा केली जाते. मागे आंब्याच्या झाडाची फांदी रोवली जाते. आंब्याच्या फळाप्रमाणे गोडवा तिने आपल्या स्वयंपाकात आणावा हीच भावना यात असेल.

श्रावणी पौर्णिमा म्हणजे यज्ञोपवीत (जानवे) बदलण्याचा उत्सव. याला “श्रावणी’ म्हणतो. तसेच बहीण भावांच्या उत्कट प्रेमाचा दिवस म्हणजे “रक्षाबंधन’. तसेच समुद्र पूजनाचा दिवस म्हणून देखील “श्रावणी पौर्णिमा’ ओळखली जाते. रक्षाबंधन म्हणजे आपुलकी जिव्हाळा यांचे अतूट बंधन. बहीण-भावाच्या हातावर राखी बांधते. भावाबहिणेचे प्रेम म्हणजे साहस आणि संयम यांचा सहयोगच असे म्हणता येईल. भोग आणि स्वार्थ याने बरबटलेल्या सर्व संबंधांमध्ये निःस्वार्थ व पवित्र असा खरा भावा-बहिणीचा प्रेमसंबंध भारतीय संस्कृतीने स्त्रीचे पूजन केले आहे. परस्त्री मातेसमान असते असे म्हटले जाते. जिथे स्त्रीचे पूजन होते तिला मान दिला जातो तिथेच परमेश्‍वराचे वास्तव्य असते. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीने न पाहता पवित्र मनाच्या भावनेने बघा असा आदेश जणू काही हे रक्षाबंधन आपल्याला देत असते. बहिणीने भावाच्या हातात राखी बांधताच भावाची दृष्टी बदलून जाते तिच्या रक्षणाची जबाबदारी तो घेत असतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भय राहू शकते. रक्षाबंधन म्हणजे ध्येय रक्षण. प्रत्येक स्त्रीकडे विकृत नजरेने न बघता पवित्र दृष्टी ठेव, हा महान संदेश याद्वारे दिला जातो. व्यापारी वर्गासाठी समुद्रपूजन महत्वाचे असते. माल आणताना नुकसान पोहोचू नये असाच भाव यात असेल म्हणून सागराचे पूजन केले जाते. याच महिन्यात जन्माष्टमीही साजरी होते.

असा हा श्रावण महिना अनेक उत्सवांचा झरा आहे. हे उत्सव ऐक्‍याचे, प्रेमाचे, प्रसन्नतेचे, भावनांचे संवर्धक आहेत यात शंका नाही. केवळ सुट्टीची मजा लुटणे म्हणजे उत्सव साजरा करणे एवढीच भावना असू नये. हे उत्सव आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजेत व उपयोगात आणून स्वतःला सुसंस्कारित ठेवता आला पाहिजे. जीवनाकडे पाहण्याची भावमधुर दृष्टी या उत्सवाद्वारे वृद्धिंगत करता येते. भावशून्य अंतःकरणाने उत्सव साजरे करू नयेत ते आपल्या जीवनात जडत्वच निर्माण करतील. हे उत्सव सण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे दर्शन घडवणारे ठरावयास हवेत तरच कालिदासाची ही उक्ती “उत्सव प्रिय खलू मनुष्य:’ खऱ्या अर्थाने योग्य ठरेल हे निश्‍चित…!

– मधुरा धायगुडे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)